मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध - विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर

Aadivashi Ekta Manch Live
0

▪️ शेजारील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील ; पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

 

नांदेड - आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान याला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराला आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी भयमुक्त वातावरण सहाय्यभूत ठरते.  निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया आदर्श आचारसंहितेप्रमाणे पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागावर आहे. तेलंगणा, कर्नाटक या दोन राज्यांच्या 200 कि.मी. सीमा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील भयमुक्त वातावरणासाठी निर्मल, आदिलाबाद, कामारेड्डी, बिदर, निजामाबाद या जिल्ह्यातील पोलीस विभागाचा परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या चार जिल्ह्यातील पोलीस विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निजामबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर, नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निर्मलच्या पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. जी. जानकी शर्मिला, कामारेड्डीच्या पोलीस अधिक्षक सिंधू शर्मा, बिदरचे पोलीस अधिक्षक एस. एल. चेन्ना बसवन्ना, आदिलाबादचे पोलीस अधिक्षक गौस आलम, नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, भोकरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरने व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिक्षक उपस्थित होते.  

 

कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टिने शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद या जिल्ह्यातील प्रशासन व पोलीस विभागाशी परस्पर समन्वय हा महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीला आळा घालण्याची दक्षता पोलीस प्रशासन घेते आहे. शेजारील जिल्ह्यांच्या सीमावर विशेष पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना सर्व पोलीस यंत्रणेला दिल्या असून नेहमीसाठीच ही दक्षता घेत आहोत असे नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले.

 

नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत शेजारील जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एक चांगला अनुभव आपण घेतला आहे. या अनुभवाला अधोरेखीत करून पुढील निवडणुका अधिक चांगल्या भयमुक्त वातावरणात पार पडतील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी निजामबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर यांनी सीमेवरील गावांचा आढावा सादर केला. याचबरोबर निर्मल, आदिलाबाद, बिदर, कामारेड्डी या जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी सीमावर्ती गावातून गुटखा, इतर बंदी असलेल्या पदार्थांची छुपी होणारी वाहतूक, निवडणूक काळात घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीचे संचलन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती गावांचा आलेख ठेवला.

0000

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !