पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव व महारोजगार मेळाव्याचे सुक्ष्म नियोजन करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Aadivashi Ekta Manch Live
0

अहमदनगर -   कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन व स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या  पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव व तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागीय महारोजगार मेळाव्याचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयातील सभागृहात  महासंस्कृती महोत्सव व विभागीय महारोजगार मेळावा आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात होणाऱ्या पाच दिवसीय संस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम  शिवचरित्रावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर  आधारित थीम तयार करण्यात यावी. लोककला सादर करणाऱ्या स्थानिक कलावंतांना यामध्ये प्राधान्य देण्यात यावे. कार्यक्रमाच्या दिवशी भव्य अश्या शोभायात्रेचे आयोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमात  विविध विभागांच्या योजनांची माहिती असलेल्या स्टॉलची उभारणी करण्यात यावी. कृषी क्षेत्रात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी विभागांच्या स्टॉलची उभारणी करून जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहतील यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. बचतगटांची उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची मांडणीही या कार्यक्रमातून करण्यात यावी. बचतगटाच्या मालाचे ब्रँडिंग होण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

     तरुणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. 

तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या विभागीय महारोजगार मेळाव्याचेही काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केल्या.

बैठकीनंतर न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या महासंस्कृती महोत्सव व विभागीय महारोजगार मेळाव्याच्या जागेची प्रत्यक्ष पहाणीही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी केली.

यावेळी सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !