▪️लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप
▪️कोणतीही जीवीतहानी नाही
नांदेड :- लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा झाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेवून आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांना तातडीने हलवून युध्द पातळीवर उपचार केले. मध्यरात्रीनंतर अचानक रुग्णांची संख्या लक्षात घेवून कुठेही न डळमळता आरोग्य विभागाने रुग्णांवर केलेले उपचाराचे व्यवस्थापन हे महत्वाचे ठरले. तात्काळ सर्व रुग्णांना रुग्णालयात हलविल्या मुळे कोणतीही जीवीत हानी न होता सर्व रुग्णांना या विषबाधेतून बाहेर काढण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सद्यस्थितीत दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 19 रुग्ण, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात 50, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात 70 व खाजगी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण असे सुमारे 500 रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार होवून ते सुखरुप असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. विष बाधा झाल्याचे तात्काळ प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून आरोग्य विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.
कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सुमारे 2 हजार भाविकांना 7 फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळलेले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, संडास अशी लक्षणे दिसून आल्यानंतर काही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, लोहा येथे दाखल करण्यात आले.
दिनांक 6 फेब्रुवारी च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच दि. 7 फेब्रुवारीच्या पहाटे डॉ. शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सुमारे 600 रुग्णांना, श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात 100 रुग्णांना, उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे 150 रुग्णांना, प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी येथे 20 रुग्णांना, डॉ. पवार रुग्णालय, लोहा खाजगी येथे 50 रुग्णांना तसेच डॉ. धनवडे रुग्णालय लोहा येथे 100 रुग्णांना औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर काही रुग्ण हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे आरोग्य विभागाने अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली.
रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 102 क्रमांकाच्या 8 रुग्णवाहिका आणि टोल फ्री 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस, 1 महामंडळ बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांवर औषधोपचारासाठी मुबलक औषधाचा साठा उपलब्ध होता. याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रुग्णांलयाना अतिरिक्त औषध साठ्याची पूर्तता करण्यात आली.
रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सदर गावामध्ये 5 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. डॉ. संतोष सूर्यवंशी (पीएसएम) अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड (पथक प्रमुख), डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल (भिषक) जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत.
00000