• ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन
नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 19 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्हयात टप्याटप्याने वाळू डेपो तयार करण्याचे काम सुरु आहे. काही वाळु डेपो कार्यान्वीत पण झाले आहेत. या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास 600 रुपये अधिक इतर कर 77 रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन 1 फेब्रुवारी 2024 नुसार वाळू विक्री करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना वाळुची आवश्यकता आहे अशा नागरिकांना नजिकच्या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा.
सदरील सेतु केंद्रावर पुढील प्रक्रियेनुसार वाळु मागणीसंदर्भात नोंदणी करावी. वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान 200 ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्चीत केली आहे. प्रत्येक लाभार्थ्याना प्रति महिना 10 ब्रास इतकी वाळु उपलब्ध करुन देण्यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
त्यासाठी जनतेने वाळू धोरण-2023 च्या अनुषंगाने वाळू बुकींग करण्यासाठी नजिकच्या सेतू केंद्राला भेट द्यावी. सेतू केंद्रधारक यांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर लॉगिन करुन ग्राहकांची आवश्यक ती माहिती भरावी जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (ओटीपी) टाकून लॉग इन करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपली घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा. शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी.
वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यत असणारे टिप्पर, टेम्पो व इतर) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोदणी करण्यात यावी. वाहतुकीचा दर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे राहील याबाबतची सविस्तर माहिती www.nanded.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच ऑनलाईन संदर्भात तक्रार असल्यास Helpline No. of Mahakhanij 020-67800800 या दुरध्वनीवर संपर्क करावा. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000