लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

Aadivashi Ekta Manch Live
0

 

मुंबई : लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे २००० भाविकांना मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शीघ्र कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची शहानिशा करून अहवाल सादर करावा, असे आदेश संचालक, पुणे, आरोग्य सेवा यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्यस्थितीत विषबाधेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या घटनेची वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने दखल घेतली असून, विभागाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 


कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सुमारे २००० भाविकांना दि. ०७ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळलेले आहे. या रुग्णांना मळमळ, उलटी, संडास अशी लक्षणे दिसून आल्यानंतर काही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, लोहा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर ६०० रुग्णांना डॉ. शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड, १०० रुग्णांना श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, १५० रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय लोहा, २० रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी (२०), ५० रुग्णांना डॉ. पवार रुग्णालय, लोहा खाजगी तसेच १०० रुग्णांना डॉ. धनवडे रुग्णालय लोहा येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे अतिरिक्त खाटांची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

रुग्णांना कोष्ठवाडी, सावरगाव, पोस्ट वाडी, रिसनगाव, मस्की या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री १०२ क्रमांकाच्या ८ रुग्णवाहिका आणि टोल फ्री १०८ क्रमांकाच्या ६ रुग्णवाहिका, खासगी 3 बसेस, १ महामंडळ बस तसेच गावातील इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला आहे. रुग्णांना औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडार, जिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांच्या पुढील तपासणीसाठी अन्न, पाणी आणि उलटीचे नमुने घेण्यात आलेले आहेत.


आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सदर गावामध्ये ०५ आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शीघ्र कृती पथक स्थापन करण्यात आलेले आहे. डॉ. संतोष सूर्यवंशी (पीएसएम) अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड (पथकप्रमुख), डॉ. नितीन अंभोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, डॉ. बालाजी माने (बाल रोग तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. तज्जमुल पटेल (भिषक) जिल्हा रुग्णालय नांदेड यांचा या पथकात समावेश आहे. 


याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने कार्यरत आहेत. विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाचे जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !