वर्धा : वसतिगृह हे विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाचा पाया असून, विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेऊन समाजाप्रती आपले कर्तव्याची जाणीव करुन घ्यावी. ज्ञानसंपन्न, विचारसंपन्न व गुणसंपन्न व्हावे, असे मनोगत वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह इमारतीच्या दूरदृष्यप्रणालीव्दारे लोकार्पण सोहळ्यात केले.
हिंगणघाट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे ई-लोकार्पण पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला हिंगणघाट येथून आ.समिर कुणावार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन अंभोरे, उपविभागीय अभियंता प्रशांत धमाने, ॲङ केशवराव धाबर्डे, शंकरराव मुंजेवार, किशोर दिघे, नगरसेवक ललीत उगवार, विक्की बोरकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले भविष्यात या वसतीगृहातील विद्यार्थी हे वसतीगृहाचा लौकीक वाढवतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी योग्य सोयी सुविधाचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक व सामाजिक प्रगती करावी, असे समिर कुणावार यांनी सांगितले.
वसतिगृह हे यापुर्वी भाड्याच्या इमारतीमध्ये कार्यरत होते. जागेच्या कमतरतेमुळे वसतिगृहात 60 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. आता वसतिगृहास शासकीय इमारत प्राप्त झाल्यामुळे एकुण 75 विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निवास, भोजन, अंथरुन, पांघरुन, निवार्ह भत्ता, स्टेशनरी इत्यादी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे प्रसाद कुळकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार सुरज छाडी यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000