मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Aadivashi Ekta Manch Live
0

नवी दिल्ली - मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रुपात उदयाला येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज व्यक्त केला.

भारताच्या विकासगाथेचा सतत उंचावणारा प्रवास असाच सुरु ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर येण्यात देशाचा मोठा वाटा आहे असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह उपस्थितांना संबोधित करत होते.

“वर्ष 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली त्या वेळी जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर होता. आता दहा वर्षांहून कमी कालावधीतच आपण आपल्यावर सुमारे दोन दशके राज्य करणाऱ्या इंग्लंडला मागे टाकत या यादीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यावर्षी आपली अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल अशी आशा सर्वांना वाटते आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येईल, तसेच वर्ष 2047 पर्यंत पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारण्यासाठी वेगाने वाटचाल करेल,” ते म्हणाले.

गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठण्याच्या बाबतीत वेगवान वाढ नोंदवली आहे असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्याहून जास्त वाढ नोंदवण्यासाठी धडपडत असताना भारताने मात्र आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान सलग तिन्ही वर्षी 7 टक्क्याची वाढ नोंदवली आहे. सध्या आपण अमेरिका आणि इंग्लंड यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाची जगातील सर्वात मोठी अर्थ तंत्रज्ञानविषयक अर्थव्यवस्था झालो आहोत.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतामध्ये जगातील सर्वात मोठी स्टार्ट अप व्यवस्था असून वेगाने विकसित होत असलेल्या अनेक युनिकॉर्न उद्योगांचा हा देश आहे. “वर्ष 2014 मध्ये देशात केवळ साडेतीनशे स्टार्ट अप्स होते. गेल्या नऊ वर्षांत भारतातील स्टार्ट अप उद्योगांची संख्या तीनशे पटींनी वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणादरम्यान ‘स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया साठीचे सार्वजनिक आवाहन केल्यानंतर, आणि 2016 मध्ये विशेष स्टार्ट-अप योजना सुरु केली, आज देशात 110 हून अधिक युनिकॉर्न उद्योगांसह एकूण 1,30,000 हून अधिक स्टार्ट-अप उद्योग कार्यरत आहेत,” ते म्हणाले.

केवळ चार वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील अवकाश क्षेत्रविषयक स्टार्ट अप उद्योगांची संख्या एकक अंकावरून 150 पेक्षा जास्त झाली आहे. केवळ जम्मू आणि काश्मीरमधील लव्हेंडर क्षेत्रात 6300 पेक्षा जास्त बायोटेक स्टार्ट अप्स आणि तीन हजारांहून अधिक कृषी तंत्रज्ञानविषयक स्टार्ट अप उद्योग कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

“लव्हेंडर पिकाच्या लागवडीत सुमारे 4000 जण गुंतलेले असून ते लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक जणांकडे तितकी अधिक पात्रता देखील नाही मात्र ते नाविन्याची आवड असणारे आहेत,” केंद्रीय मंत्री म्हणाले. 

वर्ष 2014 मध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या बाबतीत आपण 81 व्या स्थानावर होतो, तेथून 41 स्थानांची बढती मिळवून आज जगात 40 व्या स्थानावर आहोत अशी माहिती डॉ.जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली. “वैज्ञानिक क्षमता आणि तंत्रज्ञानातील कौशल्यांसह सुसज्ज असलेला 2024 मधील भारत एक विशाल झेप घेण्यासाठी सज्ज आहे,” केंद्रीय मंत्री म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !