अत्याधुनिक यंत्रसामग्री व सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
५ कोटी ५७ खर्चातून आकार घेत आहे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष
जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामग्री व इतर सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे रूप पालटून गेले आहे. या सोयी - सुविधांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन जिल्हा रूग्णालयात सर्वसामान्यांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच आग्रही असतात. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ५ कोटी ५७ लाख खर्चातून सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे रूप पाटण्यात आले आहे. या कक्षात नवीन अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. या कक्षाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पाहणी केली.
महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये असलेल्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये (OPD) केसपेपर काढणे व औषध वितरणासाठी ६ कक्ष रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच नव्याने बांधकाम करुन तयार करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांची गर्दी कमी झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्यांचे शस्त्रक्रियेपूर्वी निर्जंतुकीकरण करण्यासाठी Central Sterile Supply Department (CSSD) विभाग जिल्हा नियोजन निधीतून कार्यान्वित करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये ५ अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह (Modular OT) कार्यान्वीत करण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये १२ खाटांच्या Modular ICU (Medicine) चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सदर आयसीयू (ICU) चे काम प्रगतीपथावर आहे. रुग्णालयामध्ये सुसज्ज अशा जळीत कक्षाच्या (Burn Ward) प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असून जळीत कक्षाचे काम प्रगतीपथावर आहे.
मुतखडा (Kidney stone) असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणतीही चिरफाड न करता बाहेरुन रुग्णांच्या किडनीमध्ये असलेले मुतखडे काढण्यासाठी अत्याधूनिक Extracorporeal Shock Wave Lithotripsy (ESWL) ही परिपूर्ण यंत्रसामुग्री या रुग्णालयाच्या आवारात येत्या काही दिवसांमध्ये कार्यान्वित होणार आहे. या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णास कमी त्रास होतो व रुग्ण भरती करण्याची आवश्यकता नसते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांच्या विविध विभागांना आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीच्या खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. यामधून जे साहित्य व यंत्रसामुग्री मिळाली आहे. यंत्रसामग्री बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. औषधे, किट्स, केमीकल्स तसेच शल्यवस्तू देखील प्राप्त झालेल्या आहेत.या विविध सुविधांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा चेहरामोहर बदलणार असून अनेक उच्च दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आजच्या भेटीत वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, विविध विभागात सुरू असलेल्या दुरूस्ती कामांची पाहणी केली. त्यांनी रूग्णालयातील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय गायकवाड व रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
००००००००००००००००००